जळगाव – रेल्वे रूळ ओलांडत असताना धावत्या कामायनी एक्स्प्रेसखाली सापडून एका महिलेसह पुरुषाचा मृत्यू झाला. ही घटना पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. रत्नाबाई माधव पाटील (५९) व अशोक झेंडू पाटील (६०) अशी मृतांची नावे आहेत. पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. यावेळी दुसखेडा गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रत्नाबाई पाटील आणि अशोक पाटील यांना भरधाव एक्स्प्रेसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतातील अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते.
हरिनाम सप्ताहाला जाताना २ भाविक रेल्वेखाली चिरडले
