मुंबई- मुंबईत प्रवेश करताना आता वाहनचालकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांना १ ऑक्टोबरपासून पाच टोलनाक्यांवर १२.५० ते १८.७५ टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके असून राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या नियमित वाढ होणार आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२० मध्ये टोल दरवाढ झाली होती. त्यानंतर आता १ ऑक्टोबर २०२३ पासून पुन्हा टोल दरवाढ होणार आहे. महानगर प्रदेशातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च २००२ ते २०२७ या २५ वर्षांत वसुल वसूल करण्यासाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहेत. आता टोल दरवाढीनुसार कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची वाढ होऊन तो ४० वरून ४५ रुपये इतका होईल. मिनी बस, १२ ते २० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोलदरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ६५ वरून ७५ रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात १३० वरून १५० अशी २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ट्रेलर, मलटीएक्सल अवजड वाहनांचा टोल २६० रुपयांवरून १९० रुपये असा वाढवण्यात आला आहे.