३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढण्याची मागणी

  • मंत्री सुधीर मुनगंटीवारांचे
    केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन

मुंबई – हिंदवी साम्राज्याचे संस्थापक वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन वस्तू व सेवाकर परिषदेच्या ५० व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्री मुनगंटीवार यांनी सीतारामन यांना निवेदन देऊन शिवरायांच्या राज्याभिषेक स्मरणार्थ जारी केल्या जाणार्‍या नाण्यामध्ये सोन्याचा वापर करण्याबाबत परवानगीची मागणी केली.

यंदाचे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या २ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन आठवडाभर केले होते. त्यावेळी राज्य शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक विशेष टपाल तिकीट जारी केले. त्या अनुषंगाने स्मारक नाणे जारी करण्याचा प्रस्तावही केंद्रीय वित्त मंत्रालयाला दिला आहे, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

शिवकाळात राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे होन काढले होते. या होनची प्रतिकृती असलेले विशेष नाणे ३५० व्या राज्यभिषेकाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून काढून ते जनतेला उपलब्ध करून दिले जाईल. या नाण्यांमध्ये सोन्यासह अन्य धातूंचा वापर केला जाईल. या महत्त्वाच्या प्रस्तावाला लवकर मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्या, या अशी विनंती त्यांनी केली. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top