मुंबई – आज दिवसभर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. अजित पवार हे एक गट घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आणि आजकिंवा उद्याच हा भूकंप होणार असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार देत होते. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तर स्पष्ट म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठीही थांबण्याची गरज नाही. मी आजवर अजित पवारांच्या घरी गेलेलो नाही. मात्र आता त्यांना थेट शपथविधीसाठीच घेऊन येणार आहे. राष्ट्रवादीचे आमदारही हेच संकेत देत होते. काही आमदारांनी मुंबईही गाठली. भाजपाने दादरला बैठक सुरू केली. मात्र कुठेतरी गणित चुकले. अजित पवारांना दहाच आमदारांचा पाठिंबा आहे. हा आकडा पुढे जात नसल्याने हे बंड फसले आहे किंवा तूर्त हे बंड स्थगित ठेवण्यात आले असून, सर्व बाजूंनी येणार्या संकेतानुसार या आठवड्यातच राजकारणात मोठे स्फोट होतील.
कालपासूनच अजित पवार यांच्या बंडाची चर्चा सुरू झाली आहे. आज सकाळी शरद पवार यांनी याचा इन्कार केला. त्यानंतर संजय राऊत यांनीही बंड होणार नाही असे सांगितले. नाना पटोले यांनीही राऊतांना दुजोरा दिला. मात्र अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या सर्वांनी मोठी राजकीय घटना आजच घडणार असे वेगवेगळ्या शब्दांत सूचित केले. अण्णा बनसोडे यांनी तर अजित पवार यांच्याबरोबर 40 आमदार आहेत, अशी चर्चा असली तरी हा आकडा आणखीही मोठा असू शकतो, असे म्हटले. पृथ्वीराज चव्हाणांनीही ऑपरेशन लोटस सुरू झालेले आहे, असा इशारा दिला. शिंदे गटाच्या आमदारांनीही म्हटले की, अजित पवार आता राष्ट्रवादीत थांबणार नाहीत, ते बाहेर पडणे अटळ आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच अजित पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे हे नॉटरिचेबल झाले. त्यांचा शोध सुरू झाल्यानंतर काही तासांनी ते मंत्रालयात सापडले. मात्र मंत्रालयातही ते भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात बसलेले दिसले. यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आले.
त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, यापूर्वी अजित पवार नॉट रिचेबल झाले तेव्हा मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. मात्र अजित पवारांची नाराजी आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय यात संबंध नाही. पार्थ पवार पराभूत झाल्यापासून ते नाराज आहेत. अजित पवारांच्या शपथविधीचे प्रकरण त्यांच्यावर शेकवले. अनेक वर्षांनी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून ते घडले. अजित पवारांना नागपुरात बोलू दिले नाही. 54 आमदार असूनही बाजूला सारले गेले. मविआत ते नाराज आहेत. न्यायालयाच्या निर्णयाशी संबंध नाही. अजित पवार अजून काही बोलले नाहीत याचा अर्थ ते राष्ट्रवादीत नाराज आहेत. जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ते भाजपात किंवा आमच्या पक्षात आले तर चांगलेच आहे. राष्ट्रवादी पक्ष येणार नाही, पण अजित पवारांनी स्वतंत्र गट केला तर स्वागत आहे. हीच चलबिचल काँग्रेसमध्ये सुरू आहे, पण त्यांचा आकडा अजून जुळलेला नाही. अजित पवार कुणाच्या दबावाखाली काम करीत असतील तर मान्य नाही, पण ते दबाव झुगारून येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. दादांसह राष्ट्रवादी सत्तेत आली तर शिवसेना बाहेर जाईल. राष्ट्रवादीतील अस्वस्थता आहे ती आता उघड आहे. एक दोन दिवसात काहीतरी घडेल. मुंबईत अनेकजण त्यांना भेटायला येत आहेत तेव्हा मुहूर्त शोधतील. काहीतरी नवीन घडणार हे निश्चित आहे. ज्याला निर्णय घ्यायचा तो मुहूर्त शोधेल आणि त्या मुहूर्ताला आम्ही हजर राहू. राजकारणात न्यायालयाच्या निकालासाठी थांबत नाही.
या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तीन राजकीय भूकंप होतील. अजित पवार आले तर त्यांच्याबाबत कोणती भूमिका घ्यायची ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा फार मोठी उलाथपालथ होईल. आज-उद्या जे ठरेल त्यावर राजकारणाची दिशा ठरेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची चिंता नाही. आमची बाजू भक्कम असून. आमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. अजित पवारांच्या घरी गेलो नाही. त्यांना थेट शपथविधीला घेऊन या.
दुपारपर्यंत हा गोंधळ सुरू असताना अजित पवार मंत्रालयात आमदारांना भेटत होते. त्यांनी खारघरच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे एक पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले. त्यानंतर मात्र अजित पवार पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी बंडाच्या सर्व बातम्या पूर्णपणे खोडून काढल्या. ते म्हणाले की, मी जिवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले गेले. अजित पवार पुढे असेही म्हणाले की, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचं दाखवत आहात, ते सर्व विविध कामांनिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत. आम्ही राज्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. महागाई असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
40 आमदारांच्या सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालय कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका. बाबांनो काही काळजी करू नका. शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढ-उतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती होत नाही. खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोघे बोलणार आहेत. हे ठरवले आहे. मात्र, तरीही अजित पवार भाषण करणार नाहीत, अशा बातम्या दिल्या गेल्या हे चुकीचे आहे. बातम्यांचा विपर्यास सुरू आहे. माझ्या ट्विटर हँडलवर आहे तसे आहे. मी काय झेंडा सारखाच काय धरून ठेवू. काही झाले असेल, तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. कशाची गरज नाही. कोणीतरी बातम्या पेरण्याचे काम आमच्याबद्दल विघ्नसंतोषी लोक करत असतील. काही काही बाहेरच्या पक्षाचे लोक एनसीपीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. आमचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये.
अजित पवार म्हणाले की, आता या गोष्टींना पूर्णविराम द्या. आम्ही सर्व परिवार म्हणून काम करत आहोत. जे काही संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. आमचीही सहनशीलता कधी-कधी संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ
देऊ नका.
अजित पवार यांनी बंडाच्या वृत्ताला पूर्णविराम दिला असला तरी हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे असे सर्व राजकीय जाणकार सांगतात. आवश्यक आमदारांची जुळवाजुळव करणे अथवा सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत थांबणे या दोन्हीपैकी एक निर्णय आज झाल्याने आजचा स्फोट उद्यावर ढकलला आहे, असेच म्हणता येईल. अजित पवारांनी बंडाची शक्यता खोडून काढल्यानंतर लगेचच दादर येथे सुरू असलेल्या भाजपाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, अजित पवारांकडे हा विषय नाही, आमच्याकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही मग यावर सतत चर्चा का सुरू आहे? परंतु हा प्रश्न विचारल्यानंतर बावनकुळे यांनी अजित पवारांची बाजू घेत म्हटले की, अजित पवारांबाबत सातत्याने असा संशय निर्माण करणे योग्य नाही. अशामुळे ते आणि त्यांच्याबरोबर असलेले आमदारांची नाहक बदनामी होते.
दरम्यान महाराष्ट्रात राजकीय घडामोडी चालू असताना जपानला गेलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक दौरा अर्धवट टाकून मुंबईत परतले. अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही राहुल नार्वेकर का परतले, याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जातेय.
इकडे राजकीय भूकंपाची चर्चा
तिकडे शरद पवार कीर्तनात दंग
अजित पवार भाजपामध्ये जाणार अशा चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. अजित पवार यांनी या सगळ्यावर आपली भूमिका मांडली. मात्र मंगळवारी सकाळपासून राजकीय घडामोडी घडत असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र कीर्तनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. देहू येथील वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी निवांत कीर्तन ऐकले.
10 आमदारांची पाठिंब्याची संख्या पुढे जाईना? अजित पवारांचे बंड फसले की तूर्त स्थगित केले
