नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भव्य दिव्य सोहळ्यात देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. संसद भवन परिसरात 12 धर्मांच्या धर्मगुरूंकडून सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. बहुचर्चित सेंगोल अर्थात राजदंड वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पूजा करत संसद भवनात स्थापन करण्यात आला. राजदंड हातात घेण्याआधी मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. लोकसभेत अध्यक्षांच्या खुर्ची शेजारी राजदंडाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ही इमारत बांधणाऱ्या मजुरांचा सत्कार केला. दुपारी उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात भाषण करताना पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या कामांचा आढावा घेत गेली 9 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची असल्याचे सांगितले. संसदेच्या नव्या इमारतीतून विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असे ते म्हणाले. ज्यांना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते त्या राष्ट्रपती मुर्मू यांचा शुभेच्छा संदेश संसद भवनात वाचून दाखवण्यात आला.
नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनात महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. सकाळी सव्वासातच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. पूजेनंतर तामिळनाडूतील 18 मठांच्या मठाधिपतींनी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देऊन राजदंड सुपूर्द केला. नव्या संसद भवनाच्या इमारतीची निर्मिती करताना 60 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी त्यांनी इमारत निर्मिती करणाऱ्या काही मजुरांचा प्रातिनिधिक सत्कार केला. किशनदास (व्हिनियर डिझायनर), देवलाल, अनिलकुमार यादव (बिहार), सुब्रता सुप्रभात (बांबू फरशी), मुजफ्फर खान (मशीन रिपेअर), धर्मेंद्र (वेल्डर, दिल्ली), आनंद विश्वकर्मा (सिलिंग, वाराणसी) आदींचा सत्कार करण्यात आला.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांनी सेंट्रल हॉलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. नव्या संसद भवनात ‘संसद का नव निर्मित भवन’ हा लघुपट तसेच सेंगोलवरील लघुपट दाखवण्यात आला. राष्ट्रपतींचा संदेश राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांनी वाचून दाखवला. पंतप्रधानांनी याप्रसंगी 75 रुपयांचे विशेष नाणे जारी केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशाच्या मार्गक्रमणात असे काही क्षण येतात, जे अमर होतात. काही तारखा वेळेच्या ललाटेवर इतिहासातील अमर अक्षरे उमटवून जातात. आजचा दिवसही असाच शुभ आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारताच्या लोकांनी आपल्या लोकशाहीला संसदेच्या या नव्या भवनाची भेट दिली आहे. आज सकाळी संसद भवन परिसरात सर्वधर्म प्रार्थना झाली. मी सर्व देशवासीयांना भारतीय लोकशाहीच्या या स्वर्णीम क्षणाच्या शुभेच्छा देतो. हे केवळ एक भवन नाही. 140 कोटी भारतवासीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणाऱ्या आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवे भवन आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्याचे माध्यम बनेल. हे नवे भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचे साक्षी बनेल. विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना बघेल. जेव्हा भारत पुढे चालतो तेव्हा जग पुढे चालते. संसदेचे हे नवे भवन भारताच्या विकासातून विश्वाच्या विकासाचे आवाहन करील.’ त्यानंतर त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीचा प्रदीर्घ उहापोह केला.
सेंगोलबद्दल बोलताना मोदी म्हणाले, ‘महान चोल साम्राज्याने कर्तव्यपथ, सेवापथ, राष्ट्रपथाचे प्रतिक मानले जात होते. आदिनम संतांच्या मार्गदर्शनात हेच सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक बनले होते. आदिनमचे संत आज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्याच मार्गदर्शनात लोकसभेत हे पवित्र सेंगोल स्थापित झाले आहे. मी मानतो की हे आमचे सौभाग्य की या पवित्र सेंगोलची गरिमा, मान मर्यादा आम्ही परत दिली. जेव्हा जेव्हा या संसद भवनातली कार्यवाही सुरू होईल, तेव्हा तेव्हा हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देईल.’
देशातील लोकशाही व्यवस्थेचे कौतुक करत ते पुढे म्हणाले, ‘भारत लोकशाहीची जननी आहे. भारत आज वैश्विक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे. लोकशाही आपल्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही, एक विचार आहे, एक परंपरा आहे. आपली लोकशाहीच आमची प्रेरणा आहे. या प्रेरणेचा सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी संसद आहे. ही संसद देशाच्या ज्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, पण जो चालत राहतो त्याचेच भाग्य उजळते. म्हणून चालत राहा. गुलामीनंतर भारताने खूप काही त्यागून आपली नवी यात्रा सुरू केली होती. ती यात्रा अनेक आव्हाने पार करत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत पोहोचली आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ विकासाच्या देशाच्या स्वप्न आकांक्षांना पूर्ण करण्याचा अमृतकाळ आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.
आधी जाहीर केल्याप्रमाणे बहुतांश विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या वास्तूवर स्तुतीसुमने उधळताना लोकशाहीबाबत गौरवोद्गार काढले. मात्र लोकशाहीचे प्रतिक असलेल्या या कार्यक्रमात संसदीय लोकशाहीचा मुख्य घटक असणाऱ्या विरोधी पक्षांची बाके रिकामी होती.
12 धर्मांची प्रार्थना! मजुरांचा सत्कार! होमहवनसंसद भवनाचे भव्य उद्घाटन! राजदंडाला दंडवत
