15 आमदार बाद होतील! अजित पवार भाजपसोबत? राज्यात पुन्हा नवा पट? दमानियांच्या दाव्याने भूकंप

मुंबई – राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये जाणार असा खळबळजनक दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या लिहितात की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू..आणि किती दुर्दशा होते महाराष्ट्राच्या राजकारणाची. दमानिया यांच्या या ट्विटमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे.
या ट्विटनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी अनेक पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांच्या भूमिकेची चर्चा व्हायची. ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार व पत्नी सुनित्रा पवार यांचे नाव वगळले आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून आक्रमक होत नाहीत. ते भाजपला पुरक अशा भूमिका घेतात. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी वज्रमूठ सभा घेत आहे तर दुसरीकडे अजित पवार हे पुन्हा बंड करण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सत्तासंघर्षाबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय कधीही देऊ शकते . या निकालाच्या आधीच दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्याचे राजकारण तापले आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीने भाजपला एक प्रकारे मदत होईल अशी विधाने केली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी यांच्या बाजूचे विधान केले. मोदींच्या पदवीचा मुद्दा विरोधकांनी तापवण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादीने या मुद्यांची हवाच काढली. ईव्हीएम मशीनवर विरोधक 2014 पासून आक्षेप घेत आहेत. मात्र या मुद्यावर राष्ट्रवादीने विरोधी भूमिका घेतली आहे . त्यामुळे राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेऊ शकते अशा चर्चां सुरु आहे. दरम्यान भाजपबरोबर जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. अजित पवारांनी एका वाक्यात दमानिया यांचा विषय संपविण्याचा प्रयत्न केला. ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव वगळले हे वृत्तही अजित पवारांनी फेटाळले. सहकारी बँक व साखर कारखाना प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अद्याप क्लीन चीट दिलेली नाही असे अजित पवार म्हणाले . मात्र अजित पवार यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली. ही भेट पूर्व नियोजित होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांच्या बाबतीत मी त्यांना कालच पत्र पाठवले आहे तो विषय आज काढीन असे
ते म्हणाले.
दमानियांच्या दाव्यावर अनेक नेत्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा फेटाळत मिश्किलपणे म्हणाल्या की ,15 मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही’. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अंजली दमानिया यांच्या प्रश्नांवर मी उत्तर द्यायला लागलो तर कसे व्हायचे. त्या ट्वीटबद्दल तुम्ही दमानियांना विचारले पाहिजे. त्यांना तुम्ही विचारा की, सुप्रीम कोर्टाकडून त्यांना काही निरोप आला आहे का? मुळात सुप्रीम कोर्टाबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण सर्वांनी
स्वीकारला पाहिजे.
अजित पवार नाना पटोलेंवर संतापले
बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात. कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडत आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याऐवजी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवे होते. यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका हातानेच वाजत नाही. अशा वक्तव्यामुळे राज्यातील कार्यकर्तेही संभ्रमात पडतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. मला काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलायचे नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तो त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top