2000 च्या नोटा 30 सप्टेंबरनंतर ‘कागज का टुकडा’ बनणार

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी मोठी घोषणा करत 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे 2,000च्या गुलाबी नोटा आता चलनातून बाद होणार आहेत. या नोटा बँकेत जमा करण्यास 23 मे पासून 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, एका वेळी केवळ 10 नोटा बदलता येणार असल्याने नोटा बदलताना अडचण होणार आहे. शिवाय या नोटा चलनात राहाणार, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले असले, तरी या नोटा कुणीच स्वीकारणार नसल्याने त्यांच्या चलनात असण्याला काहीच अर्थ नसेल.
केवळ 6 वर्षांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोट धोरणाच्या अनुषंगाने 2,000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2,000 च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर 2000 आणि 500 च्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाचा प्रवाह थांबवणे दहशतवादाला होणारा पैशाचा पुरवठा रोखणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु या नोटा चलनात आणल्याने किती काळा पैसा बाहेर आला होता, हे सरकारने कधीच जाहीर केले नाही. उलट काळा पैसा जमा करायला या नोटा सोयीच्या ठरत असल्याने त्या सुरुवातीपासून वादग्रस्त ठरल्या होत्या.
गेली काही वर्षे या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. चलनातील त्यांचे प्रमाणही कमी झाले होते. मार्च 2017 पर्यंत 2,000च्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2023 रोजी त्यांचे प्रमाण 10.8 टक्के होते. त्यामुळे या नोटा बंद होणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. अखेर आज त्यावर रिझर्व्ह बँकेने शिक्कामोर्तब केले.
2,000 च्या नोटा बंद करण्याचा सर्वसामान्यांना फटका बसणार नाही, असे आता म्हटले जात असले तरी ज्यांच्याकडे या नोटा आहेत, त्यांना त्या बँकात जमा करताना तपशील द्यावा लागणार असल्याने त्यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top