शहादात दोन गटांत राडा
११ जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात शुक्रवारी रात्री १०:३० च्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीदरम्यान झालेल्या दगडफेकीत ३ जण जखमी झाले. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल झाला, तर पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याच्या निषेधार्थ शनिवारी विविध संघटनांसह कार्यकर्ते, नागरिकांनी मोर्चा काढून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंतांना निवेदन देत महिलांनी आंदोलन केले.
शहादा येथील रहिवासी रईसखा मुक्तारखा बागवान यांच्या फिर्यादीनुसार, शुभम जव्हेरी, जगदीश बोरदेकर, महेश पाटील, विक्की तांबोळी, चेतन चौधरी, गुड्डू पवार, भूपेंद्र चौधरी, पंकज चौधरी यांच्यासह १० ते ११ जणांनी शुक्रवारी रात्री गांधी उद्यानाजवळ इद्रिस बागवान याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यात रईसखा, इद्रिस, अत्तरखा बागवान हे तिघे जखमी झाले. रात्री ११ च्या सुमारास १५०० ते २००० नागरिकांचा जमाव आला आणि त्यांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला.