संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

दक्षिण मुंबईत बत्तीगुल, रेल्वेसेवा तासभर ठप्प; विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश

Light electricity
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कळवा ते ट्रॉम्बे या एमएसईटीसीएल विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युतदाबामध्ये चढउतार झाले, ज्यामुळे ट्रॉम्बे सॅलसेट-१ मध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सकाळी १० वाजता दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याने कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. याचा फटका लोकसेवेलाही बसला. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर दक्षिण मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत सुरु झाली.

तथापि, टाटा पॉवरचे हायड्रो प्लांट व्यवस्थित होते. भिरा हायड्रो प्लांट संक्रमित झाले. टाटा पॉवरने वीजसेवा पूर्ववत केली असल्याचे टाटा पॉवरकडून कळविण्यात आले. मुंबईत सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अँटॉप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात एक तासापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. एक तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. आज सकाळी टाटा पॉवर सप्लायमध्ये बिघाड झाल्याने सकाळी ९.४५ ते ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. आज रविवार असल्याने फोर्ट परिसर, माटुंगा, दादर आणि सायन परिसरात आज कार्यालये सुरू नसल्यामुळे चाकरमान्यांना त्याचा फटका बसला नाही. कामाच्या दिवशी हा वीज पुरवठा खंडित झाला असता तर कार्यालयातील कामे ठप्प झाली असती. बँकांनाही त्याचा फटका बसला असता. बँकांचे व्यवहारही ठप्प झाले असते.

वीज पुरवठा खंडित होण्याचा फटका लोकल सेवेलाही बसला. मुंबईतील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने चर्चगेट ते अंधेरी विभागातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला नाही. तसेच सुट्टीचा दिवस असल्याने कोणतीही गैरसोय झाली नाही. अनेक लोकल्स स्थानकात तसेच रेल्वे रुळावर थांबून होत्या. बराच काळ खोळंबा झाल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्यामुळे गैरसोय झाली. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकांनी बेस्टच्या बसचा आधार घेतला. तर अनेकांनी पुढील स्थानकात जाण्यासाठी रेल्वे रुळावरूनच पायपीट केली.

पश्चिम मार्गावरील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जोगेश्वरी उपकेंद्रातून वीजपुरवठा वाढविण्यात आला होता. दरम्यान, तासाभराच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. तसेच ओव्हरहेड वायरवरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. नंतर काही वेळात मुंबई सेंट्रल ते विलेपार्ले दरम्यानची रेल्वेसेवा सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami