नवी दिल्ली – युक्रेनच्या सध्या सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावून युरोपीय देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे या मोहिमेअंतर्गत समन्वय साधण्यासाठी युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये जाणार आहेत.
चार केंद्रीय मंत्र्यांवर युक्रेनमध्ये अडकलेल्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे रोमानिया आणि मोल्दोव्हा येथे जातील तर रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप पुरी हंगेरीला आणि जनरल सिंग पोलंडला जाऊन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सहाय्य करतील. सरकारने युद्धग्रस्त देशातून अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना या देशांसोबत सीमा ओलांडून बाहेर काढण्यासाठी समन्वय साधण्यासाठी सरकारने पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकिया येथे चोवीस तास “नियंत्रण केंद्रे” सुरु केली आहेत. रोमानियातील बुखारेस्ट येथून निघालेले पाचवे ऑपरेशन गंगा फ्लाइट आज सकाळी दिल्लीत आले. विमानाने २४९ भारतीय नागरिकांना परत आणलेअसून आता पर्यंत ११५६ भारतीयांना भारतात परत आणले आहे.