मुंबई – कोरोना संसार्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. बुद्धीदाता बाप्पाच्या आगमनाने कोरोनाचे विघ्न दूर होऊन लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात यासाठी डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने ज्ञानमंदिराचा देखावा सादर केला आहे. या मंडळाकडून दरवर्षी सामाजिक देखावे सादर करून अधिकाधिक जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
ज्ञान मंदिरात जाऊन ज्ञान घेणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसून त्याच बरोबर आरोग्य, मनशक्ती, खेळ, शिस्त आणि एकंदरीत व्यक्तिमत्त्व याचा विकास होत असतो, मुलांचे भावविश्व शाळेत आकार घेत असतं. मात्र शाळाच बंद असल्याने मुलांचा विकास खुंटला आहे. आज ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप वाईट परिमाण होत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांची होणारी वारंवार चिडचिड, डोळ्याचे दुष्परिणाम, सतत मोबाईलवर ऑनलाईन खेळ खेळणे, सहनशक्ती कमी होणे, एकाग्रता हरवून जाणे, मैदानी खेळ न खेळणे, स्वतः वरील मानसिक नियंत्रण कमी होणे. यासारख्या बऱ्याच व्याधी लहान मुलांना जडत आहेत. त्याचप्रमाणे खेड्यामधील मुलांमध्ये बालमजुरीचे प्रमाण वाढत आहे.

या सर्वांचा विचार करता आताची पिढी आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ आणि सशक्त तयार करायची असेल तर लवकरात लवकर शाळा सुरू झाल्या पाहिजेत मग त्यासाठीच्या सर्व उपाय योजना युद्धपातळीवर राबवल्या गेल्या पाहिजेत. मुले पुन्हा एकत्र मैदानी खेळ खेळले पाहिजेत त्यातूनच सांघिकतेचे फायदे समजून येतील. याकरता या मंडळाकडून मंडपात ज्ञान मंदिरात साकारले आहे.
यावर्षी मंडळातर्फे डोळे तपासणी शिबिर, लहान मुलांसाठी शालेय विषय वाचन किंवा कथाकथन, स्मरणशक्ती स्पर्धा, सामान्य ज्ञान असे वेगवेगळ्या विषयावर प्रश्न मंजुषा किंवा योग आणि योगासने सारखे शारीरिक मानसिक अभ्यासीय खेळ घेतले जाणार आहेत.