नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे देशभर चर्चेत आलेले किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी गुजरातमधील बँकिंग घोटाळ्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. टिकैत यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या मुद्द्याला धरुन गुजरातच्या बँक घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, देशातील बँक घोटाळ्याविरुद्ध देशातील नागरिकांनी आंदोलन करण्याची गरज असल्याचेही टिकैत यांनी म्हटले आहे.
मेरे प्यारे देशावासियों…असे म्हणत टिकैत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, कर्नाटकच्या महाविद्यालयातील हिजाब प्रकरणानंतर देशभरात आंदोलन होताना दिसत आहेत. अनेकांनी या मुद्द्यावरुन आपलं मत मांडलं आहे. त्याचा संबंध जोडत राकेश टिकैत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. हिजाबवर नको, देशातील बँकांच्या हिसाबवर म्हणजे बँक घोटाळ्यांवर आंदोनल करायला हवे. हीच परिस्थिती राहिली तर देश विकायला वेळ लागणार नाही, आणि आम्ही असे होऊ देणार नाही, असे ट्विट टिकैत यांनी केले आहे.
गुजरात बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 28 बँकांच्या कंसोर्टिया सह 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेला हा बँकिंग फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यावरुन, राकेश टिकैत यांनी ट्विट करुन मोदींवर निशाणा साधला.