मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी भोसले यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून आज सकाळीच संभाजी भोसले यांची प्रकृती बिघडली. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून बीपीही कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, रुग्णालयात दाखल न होता उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार संभाजी भोसले यांनी केला आहे.
२६ फेब्रुवारीपासून संभाजी भोसले यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंबा देण्याकरता राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. त्यामुळे खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली आहे. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या २२ मागण्या आहेत त्यापैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लावल्या जाव्यात अशी विनंती मी केली आहे. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असंही नाही असंही त्यांनी सांगितलं.
उपोषणादरम्यान संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की साठ तासांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची शुगर कमी झाली आहे तसंच रक्तदाबही कमी झाला आहे. हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. शुगर वाढण्यासाठी इंजेक्शन घ्या असं सांगितलं होतं मात्र संभाजीराजेंनी नकार दिला आहे.