रावसाहेब दानवेंचा क्लास लावू, पण आधी मराठा आरक्षण द्या; संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली – रावसाहेब दानवे यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना 11 मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत.

पुढे संजय राऊत म्हणाले, आज सकाळी अशोक चव्हाण माझ्याकडे आले होते. ते माजी मुख्यमंत्री आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. त्यावर आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते. अजित पवार, अशोक चव्हाण सोबत होते. द्या ना आरक्षण. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा हल्ला त्यांनी दानवेंवर चढवला.

मराठा आरक्षणासाठी स्थगन प्रस्ताव

खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी दानवेंना दिलं.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami