मुंबई – भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. त्यात आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डरकाळी फोडली. माझे शब्द अधोरेखित करा.. मी पुन्हा सांगतो, ‘बाप बेटे जेल जायेंगे’. त्यांच्याशिवाय तीन केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंटही तुरुंगात जातील, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ नेत्यांची यादी आपण जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. मी सांगतो बाप बेटे तुरुंगात जाणार. वेट अँड वॉच. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू. महाराष्ट्र झुकणार नाही, असे ट्विट १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेताना केले होते.
किरीट सोमय्या, विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज हे भाजपचे नेते राऊत यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मी पुन्हा सांगतोय बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याच्या निकॉन इंन्फ्रा कंपनीत पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा वापरला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवानीला ब्लॅकमेल करून सोमय्या पिता-पुत्रांनी वसईत ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींना घेतली. पीएमसी बँक घोटाळा आणि वसईतील जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करून किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.