मुंबई – शेअर बाजारात काल पुन्हा एकदा आठवड्याची सुरुवात ‘ब्लॅक मंडे’ने झाल्याचे पहायला मिळाले. पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण सुरूच राहिली आहे. दुपारी सेन्सेक्समध्ये १००० अंकांची घसरण दिसून आली. परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे आशियाई बाजारातही घसरण सुरू आहे. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे दोन शेअर्सचे दर वधारले असल्याचे दिसून आले.
दरम्यान, दुपारी १२.२० वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये ७९८.२८ अंकांची घसरण दिसून आली. यावेळी सेन्सेक्स ५७. ८५१ अंकांवर ट्रेड करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही ५९.८५ अंकांची घसरण झाली होती. तर शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनटीपीसीच्या शेअर वधारले असल्याचे दिसून आले.
एसबीआयच्या शेअरमध्ये २.४० टक्क्यांनी उसळण दिसून आली. त्यावेळी एसबीआय चा शेअर दर ५४२.९५ रुपयांवर ट्रेड करत होता. तर, एनटीपीसीचा शेअर १.२३टक्क्यांनी वधारला. त्यावेळी १३५.९० रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. एसबीआयचे चौथ्या तिमाहीचे चांगले निकाल जाहीर झाले होते. तर, राजस्थानमधील एनटीपीसीच्या सोलर प्लांटमधून निर्मिती सुरू झाली आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची सर्वात मोठी घसरण बजाज फायनान्समध्ये झाली. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, डॉ रेड्डीज, मारुती आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यात घसरण झाली होती. दुसरीकडे टाटा स्टील, पॉवरग्रीड, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स दरात वाढ झाली.