मुंबई – गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली होती. ही घसरण नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कायम राहिली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सेन्सेक्स ११७२ अंकांनी घसरला. त्यामुळे सेन्सेक्स ५६९८० अंकावर ट्रेड करत होता. त्यानंतर निफ्टीतही मोठी घसरण झाली असून निफ्टी ४०२ अंकांनी कोसळला. त्यांतर तो ३५५ अंकांनी खाली येत १७ हजार १९ वर ट्रेड करत होता. जागतिक घडामोडी, अमेरिकेतील महागाई आणि नुकत्याच उघडीकस आलेल्या २३ हजार कोटी रुपयांच्या एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्यामुळे शेअर बाजार अस्थिर झाला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आज सकाळपासूनच बाजारात विक्रीचा बोलबाला आहे. त्यामुळे SBI, ITC, ICICI Bank यांसारख्या बड्या शेअर्सना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. NSE आणि BSE वरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झाली. बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये २.५० टक्क्यांपासून ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली तर मेटल इंडेक्समध्ये ३.५० टक्क्यांनी घट झाली. परंतु टाटा कंसन्टन्सी सर्व्हिस आज टॉप ३० मध्ये तेजीत आहे. तसेच, टाटा स्टील आणि एचडीएफसीमध्ये मोट्या प्रमाणात घसरण झाली आहे
भारताव्यतिरिक्त इतर आशियाई बाजारांमध्येही सकाळी मोठी घसरण झाली. जपानच्या बाजारात 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दरम्यान, बाजारात झालेल्या विक्रीमुळे बँक निफ्टी निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजारातील प्रचंड विक्रीमुळे बीएसईवर लिस्टिंग कंपन्यांचे बाजार भांडवलही सुमारे 5 लाख कोटी रुपयांनी घसरले.