कोणत्याही कामासाठी आता केवायसी करणे गरजेचे झाले आहे. मात्र, केवायसी प्रक्रिया करताना अनेकदा आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी क्रमाकांवरून केवायसी करण्याचा मॅसेज आल्यास तिकडे क्लिक करू नका, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहे.
बँकांमध्ये केवायसी करण्याकरता एक लिंक दिली जाते. त्या लिंकमधून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, कधीकधी अनोळखी क्रमांकावरून केवायसी करण्यासाठी लिंक पाठवली जाते. ही लिंक म्हणजे सायबर क्राईमचा प्रकार असू शकतो. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.
एसबीआयने केलेल्या ट्विटनुसार, KYCFraud बद्दलची माहिती देशातील अनेक लोकांपर्यंत पोहचली आहे. पण या फ्रॉडचे प्रमाण वाढत आहे. या फ्रॉडमध्ये एखाद्या व्यक्तीला खोट्या बँकची लिंक किंवा कंपनीची लिंक एसएमएसद्वारे पाठवून एका लिंकवर क्लिक करून त्यांचे KYC अपडेट करण्यास सांगण्यात येते.’
तसेच या स्कॅम संदर्भात तक्रार करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल वेबसाइटची (National Cyber Crime Reporting Portal) लिंक देखील SBIनं या ट्वीटमध्ये शेअर केली आहे.
काय सावधगिरी बाळगाल?
मोबाईल क्रमाकांवर आणि मेलमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
कोणतेही बेकायदा अॅप डाऊनलोड करू नका.
आधार कार्ड नंबर, जन्म तारिख, डेबिट कार्ड नंबर, पिन, CVV, ओटीपी, बँक यूझर आयडी पासवर्ड इत्यादी माहिती कोणालाही देऊ नका.