अंकारा – कोरोनाचे निदान झाले तरी माणूस भीतीने कापू लागतो. कोरोना काळात एकदा कोरोना होऊन गेला तरी पुन्हा त्याचा संसर्ग झाल्याची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. पण एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल ७८ वेळा कोरोना झाला आहे. तुर्कस्तानातील ही व्यक्ती गेल्या १४ महिन्यांत ७८ वेळा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. वर्षभरापासून ती रुग्णालयातच क्वारंटाईन आहे.
५६ वर्षांचा मुझफ्फर कायासन नोव्हेंबर २०२० साली त्याला पहिल्यांदा कोरोना झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याच्यातील लक्षणे देखील कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही. तब्बल ७८ वेळा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पण प्रत्येक वेळेस त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा आयसोलेशनमध्ये जातात. यामुळे त्यांना ना आपल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत ना ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. ते खिडकीतूनच आपल्या कुटुंबासोबत थोडा संवाद साधतात. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्याने ते कोरोना लसही घेऊ शकले नाहीत.