टेक्सास- संगणक आणि संगणकाशी संबंधित वस्तूंचे उत्पादन करणार्या अमेरिकन डेल टेक्नोलॉजीस्ट या कंपनीने मागील १५ महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केली आहे.यावेळी कंपनीने सुमारे १२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही कपात केली असल्याचे सांगितले जात आहे.कंपनीने मात्र कामकाज सुव्यवस्थित करणे आणि भविष्यातील प्रगतीला चालना देणाऱ्या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे, हे या कपाती मागचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.ग्लोबल सेल्स अँड कस्टमर ऑपरेशन्सचे अध्यक्ष बिल स्कॅनेल आणि जॉन बायर्न यांनी कर्मचाऱ्यांना थेट मेमोच पाठविले. या मेमोमध्ये व्यवस्थापनात सुधारणा करण्याकरीता तसेच भविष्यातील वाढीसाठी कठोर परंतु आवश्यक पाऊले उचलत असल्याचे स्पष्ट केले आहे.कर्मचाऱ्यांना एचआर एक्झिट मिटिंगद्वारे कामावरून कमी केल्याचे सूचित केले गेले.कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक पॅकेज ऑफर केले जाणार आहे. ज्यामध्ये दोन महिन्यांचे वेतन आणि प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी अतिरिक्त आठवड्याचा पगार दिला जाणार आहे.
