जोधपूर – बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ३० दिवसांसाठी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. जोधपूरच्या भगत की कोठी येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. ७ नोव्हेंबरला जोधपूर उच्च न्यायालयाने आसाराम बापूला उपचारासाठी ३० दिवसांचा पॅरोल दिला होता.काल रात्री उशिरा त्याला रुग्णवाहिकेतून आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आसारामला पाहण्यासाठी त्याच्या समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी झाली होती. त्याला ११ वर्षांत दुसऱ्यांदा उपचारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला. यापूर्वी त्याला ऑगस्टमध्ये ७ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. आसारामच्या वतीने ज्येष्ठ वकील आर.एस. सलुजा आणि यशपाल राजपुरोहित यांनी उपचाराच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. आसारामच्या वकिलांनी रुग्णालयातून डिस्चार्ज होईपर्यंत अनिश्चित काळासाठी उपचार करण्याची परवानगी मागितली होती. मात्र सरकारचे वकील अतिरिक्त महाधिवक्ता दीपक चौधरी यांनी ३० दिवसांच्या परवानगीसाठी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आसारामला उपचारासाठी ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला.
