नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशमधील हिंदूंच्या मुद्द्यावर बायडेन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जाऊन आले. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर जो बायडन यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेची माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी मी फोनवरून संवाद साधला. या चर्चेवेळी युक्रेनची स्थिती आणि त्याचबरोबर विविध क्षेत्र आणि वैश्विक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. तसेच शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताचा पाठिंबा असेल असे सांगितले. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करताना चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था लवकरात लवकर पुर्नस्थापित करण्यावर आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची, विशेषतः हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर दिला.