झारखंड
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राहुल यांच्याविरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या याचिकेवर दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर रांचीतील एका न्यायालयाने राहुल यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. अशातच आता झारखंड उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घेत राहुल यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
झारखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय घेऊन राहुल यांना मोठा झटका दिला आहे. भाजपा नेते अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राहुल यांच्यावर आहे. याप्रकरणी २०२२ मध्ये न्यायालयाने राहुल यांना दिलासा दिला होता. न्यायमूर्ती अनिलकुमार चौधरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, चाईबासा न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असे न्यायालयाने निरीक्षण केले.
२०१८ मध्ये चाईबासा येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल यांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ‘एक खुनी व्यक्ती केवळ भाजपामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही.’ या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा नेते नवीन झा यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या बाजुने न्यायालयात युक्तिवाद करताना वकील पियुष चित्रेश म्हणाले की, ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत.