मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजल्यापासून त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येतील.
विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार आहे – १) www.mahresult.nic.in, २) http://sscresult.mkcl.org, ३) http://ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली होती. यंदा राज्यभरातून १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी ३ जून ते १२ जून हा कालावधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर छायाप्रतीसाठी ३ जून ते २२ जून या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरावे लागणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठीदेखील मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन कर्ज करायचा आहे. पण त्याआधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावयाचा आहे.
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये होणार आहे. पुनर्परिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ७ जून पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.