ओटावा – लोकांना धूम्रपानामुळे होणारा धोका लक्षात यावा यासाठी आता कॅनडा सरकारने केवळ सिगारेटच्या पाकिटावरच नव्हे तर प्रत्येक सुट्या सिगारेटवर धोक्याचा इशारा देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारा कॅनडा हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
काल बुधवारी जगभरात ‘नो टोबॅको डे ” साजरा करण्यात आला. या निमित्ताने कॅनडामध्ये सिगारेट बाबतच्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली. “धूम्रपानामुळे मुलांचे नुकसान होते”, “धूम्रपानामुळे ल्युकेमिया होतो” तसेच “प्रत्येक पफमध्ये विष आहे” अशा आशयाचे इशारे सिगारेटवर लिहिण्यात येणार आहेत. हे इशारे इंग्रजी आणि फ्रेंच अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. सिगारेट पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या या निर्णयामुळे लोकांना सिगारेटच्या धोक्याचे इशारे टाळता येणार नाहीत, असे कॅनडाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने २०३५ पर्यंत देशातील एकूण तंबाखू खाण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हा निर्णय देखील याच मोहिमेचा एक भाग आहे. एक ऑगस्टपासून या निर्णयाची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.देशातील प्रत्येक किंग-साईज सिगारेटवर धोक्याचा इशारा देण्यासाठी एप्रिल २०२४ ही डेडलाईन सेट करण्यात आली आहे. तर, प्रत्येक रेग्युलर साईज सिगारेटसाठी एप्रिल २०२५ ही डेडलाईन सेट केली आहे.”कॅनडामध्ये तंबाखूमुळे दरवर्षी कित्येक तरुण व्यक्तींचा बळी जात आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत”,असे मत कॅनडाच्या आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.