लंडन –
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ८ महिन्यांनी तेथील सरकारने त्यांच्या अंत्यसंस्कारावर झालेल्या खर्चाची माहिती उघड केली आहे. राणी एलिझाबेथ यांचे निधन ८ सप्टेंबर रोजी झाले. त्यानंतर अंत्यसंस्काराचे विधी १० दिवस चालले. त्यावर २०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला, असे सरकारने सांगितले..
१९६५ मध्ये माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निधनानंतर ब्रिटनमधील हा पहिलाच शासकीय अंत्यसंस्कार होता. महाराणी एलिझाबेथ यांच्यावर सरकारच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे त्यांच्या मृत्यूनंतर राजा झालेला त्यांचा मोठा मुलगा किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकावर सरकारने ५१३ कोटी ते १००० कोटी रुपये खर्च केले. या खर्चाला अनेक राजेशाहीविरोधी संघटनांनी विरोध केला होता. राज्याभिषेकाच्या विरोधात काही लोकांनी मोर्चेही काढले होते.