लंडन- हवामान बदलामुळे भारतात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेची झळ भारतातील 90 टक्के लोकांना बसणार आहे. आरोग्य, अन्नधान्य टंचाई आणि आर्थिक तोटा या समस्या रुद्र रूप धारण करतील. सततच्या तापमानवाढीमुळे मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होण्याची भीती आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालात भारताला हा धक्कादायक इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत भारतातील अनेक शहरांतील तापमानाचा पारा सतत चढत आहे. यंदा महाराष्ट्रात सरकारने शाळांनाही उन्हाळी सुट्टी लवकर जाहीर केलेली आहे. वातावरणातील असह्य उकाड्याने भारतीय हैराण झालेले असतानाच घाम फोडणारी बातमी आली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे 2050 पर्यंत 30 कोटी भारतीयांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होईल. यानंतर 50 वर्षांनी म्हणजे शतकाच्या अखेरीस तब्बल 60 कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उष्णतेच्या लाटांच्या तडाख्याने खालावेल, असे भाकीत या अहवालात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तापमानवाढीमुळे आशिया खंडातील तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असूनही सरकारने त्याची तीव्रता जाणून घेण्याचे गांभीर्यच दाखवलेले नाही, असेही हा अहवाल सांगतो.
पीएलओएस (पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स) क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यासंदर्भात संशोधक रमित देबनाथ यांनी सांगितले की, क्लायमेट व्हल्नेरॅबिलिटी इंडिकेटर (सीव्हीआय) मध्ये उष्णतेच्या परिणामांचा अभ्यास करताना केवळ सामाजिक-आर्थिक, जैविक, संस्थात्मक आणि पायाभूत मुद्यांचा संदर्भ घेतला जातो. भारत देश हा उष्णतेच्या परिणामांचा अभ्यास करताना सीव्हीआय पद्धत वापरतो. मात्र या पद्धतीत उष्णतेच्या लाटेचा मनुष्याच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा भारतीय लोकसंख्येवर किती तीव्रतेने परिणाम होतो, याचा अंदाज येत नाही. परिणामी या धोक्यावर उपाययोजनाच होत नाही. यासाठी उष्णता निर्देशांकाची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.
या अहवालात असे नमूद आहे की, देशाची राजधानी दिल्लीसह आणखी काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम दिसून आला आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकांकडे पंखा, वातानुकूलित यंत्रे अशा सुविधा असतात. पण ज्यांच्याकडे साध्या पंख्याचीही सोय नाही अशा लोकांचे उन्हाळ्यात विलक्षण हाल होतात. गेल्यावर्षी हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आली होती. त्याचे परिणाम अद्यापही जाणवत आहेत. ही उष्णतेची लाट नजीकच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतात उष्णतेमुळे मृत्यूची संख्या वाढण्याचा धोका आहे. शिवाय अन्नटंचाई निर्माण होईल. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन भारताची आर्थिक प्रगती आतापासूनच खुंटत चालली आहे. आर्थिक प्रगती खुंटल्याने तोटा होतो.
गेल्या काही वर्षांतील तापमानवाढीचा फटका बहुतेक आशिया खंडाला बसला असला तरी भारतात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. तसेच काही भागांत जास्त तापमानामुळे शाळाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांच्या क्रमवारीतही गेल्या वीस वर्षांत भारताची घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या 17 पैकी 11 उद्दिष्टांची भारताने पूर्तता केलेली नाही, असेही केंब्रिज विद्यापीठाने या अहवालात म्हटले.
महाराष्ट्रासह चार राज्यांत उष्णतेची लाट
हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांत उष्णतेची लाट तर, पाच राज्यांत पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडसह देशाच्या अन्य भागांत उष्णतेच्या लाटा निर्माण होणार आहेत. पूर्व उत्तर प्रदेश, मध्य आणि पूर्व भारत, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तापमान 40 ते 44 अंश सेल्सियसवर पोहोचण्याची शक्यता आहे. वातावरण बदलामुळे उष्माघाताच्या घटना वाढतील. तीव्रताही अधिक असेल. दिल्लीसारख्या शहरात विकासकामांमुळे हिरवळ कमी होत आहे. काँक्रीटचे जंगल निर्माण झाले आहे. समतोल साधण्याकडे सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
मैदानी भागातील कमाल तापमान कमीतकमी 40 अंश सेल्सियस, किनारपट्टीच्या भागात 37 अंश सेल्सियस आणि डोंगराळ भागात 30 अंश सेल्सियसवर पोहोचले आणि ते सरासरीपेक्षा कमीत कमी 4.6 अंश जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट म्हणून घोषित केले जाते.
भारतात उष्णतेमुळे मृत्यू, अन्नटंचाई, आर्थिक तोटा! ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालात इशारा
