सेनाभवन व संपत्ती शिंदे गटाला द्या!! सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

नवी दिल्ली- ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. या संदर्भातील याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाचे तरुण वकील ॲड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेची स्थावर व जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने केलेल्या याचिकेची सुनावणी आहे त्याच दिवशी या याचिकेवर 24 एप्रिलला सुनावणी घेण्याची विनंतीही गिरी यांनी न्यायालयाला केली आहे. मात्र, कोर्टाने त्यावर अजून काही स्पष्टीकरण दिलेले नाही. विशेष म्हणजे, आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असे शिंदे गटाने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर या विषयाची चर्चा बंद झाली होती. आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने उद्धव ठाकरे गटाला पक्षाच्या सर्वच संपत्तीवरही पाणी सोडावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही याचिका करणारे. ॲड. आशिष गिरी यांनी स्पष्ट केले की, या याचिकेचा शिंदे गटाशी काहीच संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक वकील आहे. महाराष्ट्रातील मतदार आहे. त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. मी शिंदेंची बाजू घेत नसून, कायद्याची बाजू घेत आहे. उद्या उद्धव ठाकरेच शिवसेनेचे अध्यक्ष राहिले तर शिवसेना भवन, शाखा आणि निधी त्यांच्याकडे जाईल. एकनाथ शिंदे अध्यक्ष झाले तर ही सर्व संपत्ती शिंदेंकडे जाईल. पण तोपर्यंत कोर्ट रिसिव्हर नेमून त्यावर स्टे लावावा. ठाकरे गट पार्टी फंडावर दावा करत आहे. त्यामुळे पूर्ण निकाल लागेपर्यंत या सर्व बाबींवर स्थगिती असावी. दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी व्हावी. कारण हे प्रकरण एकच आहे. यापूर्वी तेलंगणा, हैदराबाद आणि अण्णा द्रमुक पक्ष फुटीनंतर न्यायालयाने अशाच प्रकारे संपत्तीबाबत निर्णय दिला आहे. त्यात न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन अध्यक्षांना पक्षाची सर्व मालमत्ता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातही निर्णय व्हावा, एवढीच आपली मागणी आहे, असेही ॲड. आशिष गिरी यांनी सांगितले.
शिवसेनेच्या शाखांचे मोठे जाळे महाराष्ट्रभर आहे. मुंबईतील शिवसेना भवनातून पक्षाची सूत्रे हलवली जातात. या मालमत्तांसह पक्षाच्या निधीवर नियंत्रण मिळाल्यास ठाकरे गटाला मोठा फटका बसेल. त्यामुळे आशिष गिरी यांच्या याचिकेचा बोलवता धनी कुणी वेगळाच आहे का, याची चर्चा होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top