वॉशिंग्टन –
अमेरिकेतील सिएटल येथील ॲपल स्टोअरमधून चोरट्यांनी ४.१० कोटी रुपये किमतीचे ४३६ आयफोन लंपास केले. यावेळी चोरांनी ॲपल स्टोअरच्या शेजारी असलेल्या कॉफी शॉपचा वापर करून स्टोअरची सुरक्षा यंत्रणा भेदत ही चोरी केली. यात सुमारे ५०,००० डॉलर म्हणजेच ४.१० कोटी रुपये किमतीचे ४३६ आयफोन चोरी करण्यात आले.
‘सिएटल कॉफी गियर’चे सीईओ माईक ऍटकिन्सन यांनी घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, चोरांनी जवळच्या कॉफी शॉपचा वापर करून ॲपल स्टोअरमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी कॉफी शॉपमधून कोणतीही चोरी केली नाही. त्यांनी कॉफी शॉपचे कुलूप आणि बाथरूमची भिंत फोडली. चोरांनी कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला आणि नंतर तिथून दुकानाची सुरक्षा उपकरणे तोडत ॲपलच्या दुकानात प्रवेश केला. हा पूर्वनियोजित कट होता. दुकानाचा आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा पूर्ण अभ्यास करून चोरांनी हा कट रचला.चारांना दुकानाची माहिती असण्याची शक्यता आहे. दरम्यान, चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून चोरांचा तपास सुरू आहे.