मुंबई – ‘भांजे’ अशी वैशिष्ट्यपूर्ण हाक मारत भाचा दुर्योधनाला चिथावणी देणार्या ‘महाभारत’ मालिकेतील कपटी शकुनी मामाचे पात्र साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे आज वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अभिनय विश्वात येण्यापूर्वी गुफी पेंटल भारतीय लष्करात होते.
टीव्ही अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोमवारी गुफी पेंटल यांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून गुफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. हृदय आणि किडनीच्या विकाराने ते ग्रस्त होते. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
गुफी पेंटल यांचे पूर्ण नाव सरबजीत गुफी पेंटल असे होते. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू होते, तेव्हा ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. युद्धाच्या काळात कॉलेजमध्येही सैन्य भरती सुरू होती. गुफीदेखील लष्करात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग चीन सीमेवरील आर्मी आर्टिलरीमध्ये झाली होती. सीमेवर मनोरंजनासाठी टीव्ही व रेडिओ नव्हता, त्यामुळे आम्ही सैनिक रामलीला सादर करत. रामलीलामध्ये ते सीतेची भूमिका करत. अभिनयाची गोडी वाढल्यानंतर गुफी 1969 मध्ये त्यांचे धाकटे भाऊ कंवरजीत पेंटल यांच्या सांगण्यावरून मुंबईत आले. मॉडेलिंग व अभिनय शिकले. 1988 मध्ये बी.आर.चोप्रा यांच्या महाभारत या महामालिकेत गुफी पेंटल यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेची आजही आठवण काढली जाते. कानून, सौदा, अकबर बिरबल, ओम नम: शिवाय, मिसेस कौशिक की पाच बहुए, कर्ण संगिनी, जय कन्हैय्या लाल की यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. गुफी यांनी 1975 मध्ये रफूचक्कर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी देस परदेस, दावा, घूमसारख्या काही हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या.
महाभारतातील शकुनी मामा गुफी पेंटल यांचे निधन
