पणजी
गुजरातच्या मुंद्रा बंदरावरून केरळला जाणाऱ्या एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला काल दुपारी गोव्याच्या समुद्रात आग लागली . या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला. तो फिलिपीन्सचा नागरिक आहे.
हे जहाज धोकादायक (आयएमडीजी) माल घेऊन जात होते. हा माल समोरच्या भागात होता आणि तिथेच स्फोट झाला . गोव्याजवळ कारवार येथे तळ असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला सतर्कतेचा इशारा दिला होता. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे जहाजाला आग लागली आणि आग पसरली. सुरुवातीला, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग विझवण्याचा प्रयत्न केला , पण त्यांना ती आटोक्यात आणता आली नाही. आग डेकवर वेगाने पसरली त्यामुळे कंटेनर फुटले. जहाजावरील १६० पैकी २० कंटेनरला आग लागली आहे.
मालवाहू जहाज भारतीय किनाऱ्यापासून सुमारे ८० नॉटिकल मैलांवर आहे. यात फिलिपिन, मॉन्टेनेग्रिन आणि युक्रेन नागरिकांसह २१ कर्मचारी आहेत. हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरातून कोलंबो, श्रीलंकेकडे जात होते.
गोव्याच्या तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटिया यांनी सांगितले की, त्यांनी अग्निशमन उपकरणांसह तीन जहाजे मदतीसाठी पाठवली आहेत. शिवाय एक डॉर्नियर विमान देखील पाठवले आहे . मुंबई बंदरातून इमर्जन्सी टोइंग व्हेसेल (ईटीव्ही) देखील पाठवण्यात आले आहे. कोची तळाला मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यास सांगितले असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे मेरीटाइम ऑपरेशन सेंटर आणि इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन यांनाही परिस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय नौदलाने अतिरिक्त सहाय्य आवश्यक असण्याच्या दृष्टीने तटरक्षक दलाशी समन्वय साधला आहे.
