नाशिक – नाशिकमध्ये २०२७-२८ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रारूप सिंहस्थ आराखडा अंतिम केला जात आहे. कुंभमेळा काळात शहरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातून वाहणार्या नद्यांवर २१ पूल उभारले जाणार आहेत. त्यासाठी बांधकाम विभाग २८५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना निर्देश दिले असून प्रारूप प्रस्ताव सिंहस्थ आराखडा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना सादर करण्यात येत आहेत. येत्या महिनाभरात प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करून अंतिम आराखड्यासाठी सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सिंहस्थ काळात येणाऱ्या साधू महंत व कोट्यवधी भाविकांना मुलभूत सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्याष्टीने बांधकाम विभागाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य वैद्यकीय मलनिस्सारण विभागाप्रमाणेच बांधकाम विभागाने आपला प्रारूप प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. या प्रस्तावानुसार शहरात २१ ठिकाणी २८५ कोटींचे पूल उभारण्यात येणार आहेत. याअंतर्गत अस्तित्वातील पुलाचे रुंदीकरण तर काही ठिकाणी नवीन पुल उभारले जाणार आहेत. यात गोदावरी नदीवर ९ ठिकाणी, वालदेवीवर १, नंदीनीवर ७, वाघाडी- अरुणावर ४ पूल प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार बजारी यांनी दिली. या सर्व योजनांसाठी २८५ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.
कॉलेज तरुणीचा मृत्यू