गर्भावस्थेदरम्यान दिसून येणाऱ्या जाडसर निळ्या व काळ्या वाहिन्यांना व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. अशा वाहिन्या दिसून येणे ही सर्वसाधारण बाब आहे. काही महिलांना गर्भावस्थेमध्ये याचा फारसा त्रास होत नाही. अशा वाहिन्यांमुळे पाय थकल्यासारखे वाटतात व दुखतात, सूज येते, जळजळ होते. बराच वेळ उभे राहावे लागले तर ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. काही महिलांना लक्षणे अजिबात जाणवत नाहीत, परंतु तरीही त्यांना पायावरच्या या वाहिन्यांना तोंड द्यावे लागते. याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉ. संतोष पाटील.
गर्भावस्थेमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होणे, हे सर्रास आढळते आणि अंदाजे 70 टक्के गरोदर महिलांना हा त्रास होतो. गर्भावस्थेशी संबंधित असलेल्या अनेक घटकांमुळे हा त्रास संभवतो. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन यांची निर्मिती वाढल्याने स्नायू शिथील होतात आणि वाहिन्यांचा आकार वाढतो. वाहिन्यांचा आकार वाढल्याने हृदयाच्या झडपा अकार्यक्षम होऊ शकतात. गर्भावस्थेशी संबंधित असलेला एक परिणाम म्हणून शरीरातले रक्ताचे प्रमाण वाढले की ही अकार्यक्षमता अधिक क्लिष्ट होऊ शकते.
गर्भावस्थेच्या अखेरच्या कालखंडामध्ये गर्भाशयाचा आकार वाढू लागला की आतील बाजूच्या व्हाने काव्हा व पेल्व्हिक व्हेन्सच्या मार्गात आलेल्या अडथळ्यामुळे वाहिन्यांचा आकार वाढू लागतो.
फुगीर झालेल्या वाहिन्या डोळ्यांना दिसताना त्रासदायक वाटतात. इतकेच नाही, तर त्यामुळे अस्वस्थ वाटते, पाय दुखतात, त्वचेमध्ये बदल होतात, थ्रोम्बोफ्लेबायटिस व डीप व्हेन्स थ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) असे त्रासही होऊ शकतात.
व्हेरिकोज व्हेनचा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांची परिस्थिती गंभीर होणे टाळण्यासाठी पुढील उपाय करता येऊ शकतात:
· बराच वेळ उभे राहावे किंवा बसावे लागत असेल तर शक्य तितक्या प्रमाणात फिरण्याचा प्रयत्न करा.
· बसताना पाय क्रॉस करून बसू नका.
· जास्तीत जास्त वेळा पाय वर उचला.
· मॅटर्निटी सपोर्ट होस परिधान करा. या खास प्रकारच्या पँटीहोसमुळे पायाचे स्नायू अलगत दाबले जातात आणि अशुद्ध रक्त हृदयाकडे परत पाठवण्यास मदत होण्याच्या दृष्टीने वाहिन्या थोड्या पिळल्या जातात. नेहमीच्या पँटीहोसपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत. यामध्ये पायावर हळूहळू दाब दिला जातो. घोट्याकडे जास्त दाब दिला जातो आणि पायावर कमी दाब आणला जातो. पायावर विशिष्ट ठिकाणी चिमटा बसेल अशा प्रकारचे घट्ट सॉक्स किंवा नी-हाय घालणे टाळले पाहिजे. अन्यथा, रक्तप्रवाहामध्ये अडथळे येऊ शकतात.
· योग्य प्रकारचे कम्प्रेशन स्टॉकिंग वापरले तर बरीचशी लक्षणे आटोक्यात येऊ शकतात. योग्य स्टॉकिंगची निवड करणे गरजेचे आहे. स्टॉकिंगमुळे येणारा दाब हा व्हेरिकोज व्हेन्सच्या तीव्रतेनुसार वेगवेगळा असतो. स्पेशलिस्ट डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात.
· डॉक्टरांनी परवानगी दिली तर रोज सौम्य स्वरूपाचा व्यायाम करा.
· शरीरातील उजव्या बाजूच्या व्हेना काव्हावरील ताण दूर ठेवण्यासाठी डाव्या बाजूला झोपा.
व्हेरिकोज व्हेन्सवर सांगितले जाणारे उपचार गर्भावस्थेमध्ये करता येत नाहीत. डीव्हीटीची शक्यता तपासण्यासाठी गर्भावस्थेमध्ये अल्ट्रासाउंड गरजेचे आहे.
प्रसूतिनंतर चार महिन्यांहून अधिक काळ व्हेरिकोज व्हेन्स कायम राहिल्या तर स्पेशलिस्ट जाणे गरजेचे आहे, तसेच या त्रासाची योग्य काळजी घ्यायला हवी. एंडोव्हेन्स व्हेनासील किंवा लेसर अब्लेशन उपचार, आणि/किंवा स्क्लेरोथेरपी अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह उपचारांद्वारे व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करता येऊ शकतात.