संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेच मुख्य सूत्रधार; जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे हा समाजासाठी धोकादायक आहे. ज्या व्यक्ती हिंदुत्वविरोधी आहेत, धर्मद्रोही आहेत, त्यांना लक्ष्य करायचे, असा उद्देश डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांनी ठेवला होता, असा दावा करत सीबीआयतर्फे त्याच्या जामीन याचिकेला उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटरची व्यवस्था करण्याचे काम तावडे यानेच केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

डॉ. दाभोलकर हत्येचा मुख्य कट रचणारा हा तावडे आहे. सनातन संस्थेची श्रद्धा व परंपरेला विरोध करणाऱ्या व हिंदूंविरोधात असणाऱ्या लोकांची हत्या करणे, हेच उद्दिष्ट डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वीरेंद्र तावडे याचे होते, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली. त्याने मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळस्कर तसेच एड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना सोबत घेऊन कट रचला. दाभोलकर हे आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत अंधश्रद्धेविरुद्ध मोहीम राबवत होते. त्यामुळे सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती अशा हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य असलेल्या तावडे व अन्य आरोपींच्या लेखी ते दुर्जन होते. म्हणूनच त्यांनी दाभोलकर यांना लक्ष्य केले. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश व साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्यांच्या घटना या परस्परसंबंधित आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. तसेच दाभोलकर यांची हत्या करून ज्या व्यक्ती सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीच्या विचारधारांचा विरोध करतील त्यांची अशीच गत होईल, असा संदेश देऊन समाजात दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा हेतू होता. या चारही हत्या म्हणजे केवळ साध्या हत्या नसून दहशतवादी कृत्ये आहेत.

२० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर हे मॉर्निंग वॉक करत असताना बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे आरोपींविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखालील कठोर कलमे लावण्यात आली आहेत. तावडेला जामीन दिल्यास ते समाजासाठी धोकादायक ठरेल’, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami