पाटणा- मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक विशेष ट्रेनच्या वातानुकूलित (एसी बोगी) डब्यात भीषण आग लागली. ही ट्रेन बिहार मधील आरा येथील कारीसाथ भागात थांबली असता ही घटना घडली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशी धावू लागले. या बोगीत प्रवाशांची संख्या कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोगीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बिहारच्या दानापूरहून मुंबईच्या दिशेने ही होळी विशेष ट्रेन येत होती. अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तसेच या मार्गावरुन येणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.