नवी दिल्ली
नवी दिल्लीतील भाजपाच्या उमेदवार बन्सुरी स्वराज मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या डोळ्याला दुखापत होऊन डोळ्यांना सूज आल्याने त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डोळ्यांच्या उपचारानंतर त्यांनी सोशल मीडियावर डॉ. नीरज वर्मा यांच्याबरोबरच फोटो पोस्ट करून घटनेची माहिती दिली.
बन्सुरी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्या मोती नगर सत्यनारायण मंदिरातील माता की चौकी येथे उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पूजेचे ताट त्यांच्या डोळ्याला लागले. डोळ्याला सूज आल्यावर त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. डॉक्टरांनी बन्सुरी यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बन्सुरी स्वराज या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत.