तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेने रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या तीन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. या कालावधीत मेल आणि एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या नियोजित स्थळी १५ ते २० मिनिटे उशिरा पोहचतील.

रविवारी दुपारी १ ते पहाटे ४ या वेळेत ठाणे ते कल्याण ५ आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येतील.तसेच मुंबईतून जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ अप-डाऊन मार्गावरही मेगाब्लॉक आहे. हा मेगाब्लॉक रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत असेल. या ब्लॉक दरम्यान डाउन हार्बर मार्गावरील सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, सीबीडी बेलापूर ते पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव या मार्गावरील सेवा रद्द राहतील.त्याचप्रमाणे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली अप-डाऊन एक्स्प्रेस मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असा पाच तासांचा मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top