नवी दिल्ली :
इंडिगो विमानाने काल तब्बल १३ तास उशिराने उड्डाण घेतले. या विलंबाबत घोषणा देत असताना पायलटवर एका प्रवाशाने हल्ला केला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता इंडिगो प्रशासनाने संबंधित प्रवाशाविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे.
काल इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीतून गोव्यात जात असताना दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विमान उड्डाणाला १३ तास उशीर झाल्याने सर्व प्रवासी संतापले होते. त्यातील एका प्रवाशाने विमान पायलटवरच हात उगारला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून इंडिगो विमानाविरोधातील तक्रारीत वाढ झाली आहे. पायलटवर हात उगारणाऱ्या प्रवाशाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यानुसार, या संबंधित प्रवाशावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे, तर काही प्रवाशांनी इंडिगोच्या विलंबाकडे लक्ष वेधले. दरम्यान, या प्रकरणी इंडिगोने याप्रकरणी चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीकडून आता याप्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान विमान कंपनी या प्रवाशावर ३० दिवसांची बंदी घालू शकते. समितीला ३० दिवसांच्या आत निर्णय घ्यायचा आहे.