कोलकाता – कोलकाताच्या दुर्गा पूजा मंडळाने देवीचा मंडप उभारण्यासाठी सार्वजनिक रस्त्यालगतची झाडे वन खात्याची परवानगी न घेता तोडणे भलतेच अडचणीचे ठरले आहे.कोलकाता उच्च न्यायालयाने मंडळाच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला असून झाडे तोडल्याची शिक्षा म्हणून ५० नवी झाडे लावून त्या झाडांची जोपासना करण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत.
कोलकाताच्या साॅल्ट लेक परिसरातील दुर्गा पूजा मंडळाने भव्य मंडप उभारला आहे. मंडपाच्या उभारणीत अडथळा ठरणारी झाडे मंडळाने मजुरांकरवी तोडली असा आरोप आहे.एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याने कोलकाता उच्च न्यायालयात याचिकेद्वारे हा आरोप केला आहे.
याचिकेवर मुख्य न्यायाधीश टी एस शिवग्ननम आणि न्या.सुप्रतिम भट्टाचार्य यांच्या संयुक्त खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणी वन खात्याने मंडळावर दंडात्मक कारवाई केलेली दिसते. मात्र या गुन्हयासाठी नुसता आर्थिक दंड ठोठावून भागणार नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असलेली झाडे तोडलीत त्याची शिक्षा म्हणून पन्नास नवी रोपे लावा आणि त्यांची नीट वाढ व्हावी याची काळजी घ्या.