गांधीनगर – जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने भारतात आपला वाहननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी गुजरातची निवड केली आहे. जानेवारीमध्ये गांधीनगर येथे होणार्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये टेस्लाचा प्लांट उभारण्याचा विचार होता. परंतु गुजरातने इतर राज्यांतील अनेक प्रकल्पांप्रमाणे हाही प्रकल्प आपल्याकडे वळवला आहे.
गुजरातचे प्रवक्ते आणि राज्याचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी इलॉन मस्क हे गुजरातमध्ये भारतातील पहिला प्लांट उभारणार असून, त्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारने टेस्लाचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी साणंद, बेचराजी आणि धोलेरा ही ठिकाणे सुचवली आहेत. गुजरातमधील साणंद जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी टेस्ला कंपनीने रस दाखविला आहे. टेस्ला कंपनी सुरुवातीला 2 अब्ज डॉलर गुंतवणार आहे. या प्रकल्पाची घोषणा होईल तेव्हा टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्क हे स्वतः उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे. टेस्ला कंपनीची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेस्लाने 2022 साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी अमेरिकेचा दौरा केला, तेव्हा टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते. मध्यंतरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेतील टेस्लाच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती.
टेस्लाने यापूर्वी जाहीर केले होते की, ईलेक्ट्रिक वाहनासाठी लागणार्या बॅटरीचे उत्पादन भारतात करण्यात येईल. त्यानंतर ईलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याचीही घोषणा केली. भारतातील नेमक्या कोणत्या राज्यात हा प्रकल्प उभारायचा याबाबत टेस्लाकडून यावर्षीच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्यात येणार होता. टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा ही राज्य प्रयत्नशील होती. काही राज्य सरकारांनी इलॉन मस्क यांना त्यांच्या राज्यात प्रकल्प थाटण्याचे आवाहन केले होते. मात्र, यात गुजरातने इतर राज्यांवर मात केली आहे. टाटा मोटर्समुळे गुजरात ऑटो मोबाईल हब म्हणून उदयास आले आहे. गुजरातमध्ये फोर्ड मोटर्स, टाटा मोटर्स आणि सुझुकी या वाहन कंपन्यांचे कारखाने आहेत.
टेस्लाने गुजरातची निवड करण्यामागे इथे असलेले बंदर कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. गुजरातमध्ये वाहन उत्पादन केल्यानंतर ते बंदरमार्गे इतर देशांत निर्यात करण्याची टेस्लाची योजना आहे. साणंद जिल्ह्यापासून कांडला-मुंद्रा बंदरापर्यंत वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे वाहन निर्यात करणे शक्य होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.