मुरुड
अलिबाग मधील मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. डायक्लोफिनॅक हे औषध जनावरांसाठी पूर्वी वापरले जायचे, मात्र या मृत जनावरांचे मांस खाणाऱ्या गिधाडांवर याचा विपरीत परिणाम झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात गिधाडे मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आल्यावर शासनाने या औषधावर बंदी घातली.
अशा परिस्थितीतही गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी फणसाड व ग्रीन वर्क ट्रस्ट यांनी गिधाड आहार केंद्राची स्थापना केली. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देऊन आपल्या हद्दीत मृत जनावर असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. मात्र, यासाठी वारंवार मृत जनावरे मिळत नसल्याने सध्या या मोहिमेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. या अभयारण्याच्या आजूबाजूला मुरुड, रोहा, अलिबाग या तालुक्याच्या सीमा आहेत. या तिन्ही तालुक्यांतील क्षेत्रात गावांची संख्या कमी असल्याने जनावरे पाळण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे मृत जनावरे मोठ्या प्रमाणात मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान, या अभयारण्यात नुकताच इजिप्शियन व्हल्चर (गिधाड ) सापडला आहे. त्याचा अधिवास वाढवण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करण्याची गरज आहे.