ITR Filing Deadline: शेवटच्या क्षणी गडबड नको! ITR भरताना ‘या’ 10 चुका नक्की टाळा

ITR Filing Deadline

ITR Filing Deadline: केंद्र सरकारने आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत (ITR Filing Deadline) वाढवली आहे. ही मुदत वाढली असली तरी वेळेत रिटर्न भरणे चांगले, कारण त्यामुळे चुका टाळता येतात आणि अडचणी सुधारण्यासाठी वेळ मिळतो.

जर तुमचे एकूण उत्पन्न जुन्या कर प्रणालीनुसार 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा नवीन कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर रिटर्न भरणे बंधनकारक आहे.

उशिरा रिटर्न भरल्यास चुका वाढतात आणि दंडाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ITR भरताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, त्याविषयी जाणून घेऊया.

ITR भरताना या 10 चुका टाळा

चुकीचा फॉर्म: तुमच्या उत्पन्नानुसार योग्य फॉर्म निवडा. वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी आणि भांडवली नफा नसल्यास फक्त ITR-1 वापरा.

पडताळणी न करणे: रिटर्न फाइल केल्यानंतर ई-व्हेरिफाय करणे आवश्यक आहे, अन्यथा तो सबमिट झाला नाही असे मानले जाते.

चुकीचे वर्ष: 2024-25 या आर्थिक वर्षासाठी AY 2025-26 हे वर्ष निवडा, अन्यथा दंड होऊ शकतो.

माहितीतील त्रुटी: नाव, जन्मतारीख, बँक खाते किंवा संपर्क माहितीतील चुका रिटर्न प्रक्रियेत अडथळा आणू शकतात.

इतर उत्पन्न लपवणे: बचत किंवा मुदत ठेवींवरील व्याज, भाडे किंवा भांडवली नफा जाहीर करणे गरजेचे आहे, अन्यथा नोटीस येऊ शकते.

चुकीचा फॉरमॅट: मागितलेली माहिती योग्य फॉरमॅटमध्ये भरा, अन्यथा त्रुटी येऊ शकतात.

कर प्रणालीतील चूक: तुमच्या उत्पन्नानुसार फायदा देणारी कर प्रणाली निवडा.

सवलतींचा दावा न करणे: भांडवली नफा गुंतवल्यास मिळणाऱ्या सवलतींचा दावा करा.

नोटीसकडे दुर्लक्ष: आयकर विभागाची नोटीस आल्यास त्वरित प्रतिसाद द्या, अन्यथा दंड किंवा कारवाई होऊ शकते.

अग्रिम कर न भरणे: कर वेळेत भरा, उशिरा किंवा कमी भरल्यास प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज लागते.

या चुका टाळून वेळेत रिटर्न भरल्यास कर प्रक्रिया सुकर होते आणि दंड टाळता येतो. त्यामुळे 15 सप्टेंबपर्यंतची वाट न पाहता, लवकरात लवकर रिटर्न भरा.