दोन महिन्यापूर्वीच बांधलेला भिवंडीचा पूल गेला वाहून!

भिवंडी – दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला भिवंडीतील कुहे ग्रामपंचायत हद्दीतील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. मढवी पाडा,भरेनगर भंडारपाडाकडे जाणारा हा पूल कोसळल्याने आदिवासी दुर्गम भागातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे.

या घटनेनंतर या पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाई करावी, पूल तत्काळ बांधून द्यावा अशी मागणी एका पत्राद्वारे श्रमजीवी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.भिवंडी तालुक्यात चिंबिपाडा परिसर हा आदिवासीबहुल विभाग आहे.कुहे ग्रामपंचायत ही आदिवासी हद्दीत आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मढवी पाडा,भरे नगर भंडारपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दोन महिन्यांपूर्वी एका छोट्या नदीवर पूल बांधला होता; मात्र पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने पुलाच्या मलब्यामुळे पुलालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.