मुंबई – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यावर्षी उपलब्ध केलेल्या २०२ गणपती स्पेशल गाड्या बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ मिनिटांत फूल झाल्या. दरवर्षी हेच घडते त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. बुकिंगमध्ये काळाबाजार झाल्याचा संशय प्रवासी आणि काही प्रवासी संघटनांनी व्यक्त केला आहे.कोकण रेल्वे मार्गावरील गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग काल रविवारपासून सुरू झाले आणि अवघ्या आठ मिनिटांत बुकिंग फूल झाले. त्यामुळे बहुतांश चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली.गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत कामाधंद्यानिमित्त वास्तव्य करून असलेले बहुतांश कोकणावासी आपल्या मूळ गावी जातात. यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्त कोकण रेल्वे प्रशासनाने २०२ गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र अवघ्या आठ मिनिटांत गाड्या फूल झाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी बुकिंग सुरू होताच कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतिक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांत एक हजारांच्या पार गेली होती. त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती.









