Home / News / गणपतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी ६ गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी ६ गाड्या

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलैपासून ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर सुरू झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटात फुल्ल झाले आहे. त्यामुळे गुरुवारी आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचे जाहीर करण्यात आले.कोकणात गणपतीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.

रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक विशेष, मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून सहा दिवस, बांद्रा ते कुडाळ साप्ताहिक विशेष, अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष, विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन, अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन या गाड्यांचा समावेश आहे. याआधी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने सात विशेष गाड्या जाहीर केल्या.याच बरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.या विशेष गाड्या २ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यत वेगवेगळ्या तारखांना मुंबईतून सोडल्या जातील.

Share:

More Posts