Home / News / एमपीएससी आंदोलन यशस्वी अखेर परीक्षा पुढे ढकलली

एमपीएससी आंदोलन यशस्वी अखेर परीक्षा पुढे ढकलली

पुणे – पुण्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑगस्ट रोजी नियोजित...

By: E-Paper Navakal

पुणे – पुण्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑगस्ट रोजी नियोजित असलेली राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलली. या परीक्षेची नवी तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. मात्र राज्य सरकारने अन्य मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.
परीक्षा पुढे ढकलण्याव्यतिरिक्त कृषी विभागातील 258 पदांचा समावेश एमपीएससीच्या नोकरभरतीच्या जाहिरातीमध्ये करावा, त्याची अधिसूचना येत्या पाच दिवसांत काढावी आणि कृषी विभागाच्या ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील 15 हजार पदांच्या भरतीची अधिसूचना पुढील दहा दिवसांत काढा, नाहीतर आणखी उग्र आंदोलन करू, असा इशारा या आंदोलनात सहभागी झालेले शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केली. कृषी पदे आणि दोन श्रेणीतील पद भरती या मागण्यांबाबत सरकारने आज काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठीची आयबीपीएस परीक्षा या दोन्ही परीक्षा 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना दोनपैकी एका परीक्षेला मुकावे लागले असते. त्यामुळे परीक्षेची तारीख बदला, अशी मागणी विद्यार्थी करीत होते. पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. अखेर याविरोधात आक्रमक होत मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेकडो विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठ येथे रस्त्यावर उतरले. एमपीएससी आणि राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थ्यांनी अहिल्या वाचनालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हे ठिय्या आंदोलन आज सलग तिसर्‍या दिवशीही सुरू होते.दिवसागणिक विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली. अलका चौक ते दांडेकर पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शास्त्री मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल सकाळी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तर रात्री कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे आंदोलन स्थळी दाखल झाले. रात्रभर ते आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत बसून होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर याहून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
आज शरद पवार यांनी देखील विद्यार्थ्यांची बाजू घेत आंदोलनात सामील होण्याचा इशारा दिला होता. अखेर आज बोर्डाने घाईने बैठक घेऊन परीक्षेची तारीख पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर झाल्यावरही इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्यावर पोलीस ताफा बोलावून आंदोलकांना पांगवत काही विद्यार्थ्यांना अटक करून पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यात विद्यार्थी कोण आहेत, त्यांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे त्याचा तपास आम्ही करू, असा इशाराच पोलिसांनी दिला.

आंदोलन राजकीय! भाजपा आमदाराचा आरोप
शासन लक्ष देत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केलेले असताना भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप केला. काल बदलापूर येथे झालेले आंदोलनही राजकीय प्रेरित असल्याचा आरोप भाजपा मित्रपक्ष शिंदे गटाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय प्रेरित होते, असा आरोप करणारे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना सवाल करण्यात आला की, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागच्या वेळच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिमन्यू पवार स्वतः आंदोलनस्थळी आले होते. ती त्यांची भेट राजकीय होती, असे आता म्हणायचे का? या प्रश्नाला ते कोणतेच उत्तर देऊ शकले नाहीत.

Web Title:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.