उल्हासनगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन

उल्हासनगर – सेवानिवृत्तीनंतर लागू असलेली देणी आणि थकबाकी व्याजासह एकरकमी मिळावी या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आपल्या मागणीसाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे उपोषण आंदोलन ‘कायद्याने वागा’ या संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोर केले जाणार आहे. पालिका प्रशासनाने या कर्मचार्‍यांना तुटपुंज्या दिल्या जाणार्‍या दोन हजाराच्या रकमेला ‘भीक’ संबोधून ती नाकारली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना त्यांच्या थकबाकीवर व्याजासह एकरकमी रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही उल्हासनगर महापालिकेने आर्थिक चणचणीचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांची ही हक्काची देणी थकवली आहेत. याबाबत अनेकदा मागणी, निवेदने दिल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी आयुक्त विकास ढाकणे यांनी मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची आयुक्तांशी झालेली ही शेवटची चर्चा समजून येत्या १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, भगवान कुमावत, नंदलाल समतानी यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार आहेत.