Home / News / दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा! अरविंद केजरीवालांची भरसभेत घोषणा

दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा! अरविंद केजरीवालांची भरसभेत घोषणा

नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. आपण राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या निवडणुकादेखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबर घेण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले.
अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही काम करू शकणार नाही, असे काही जणांना वाटत आहे. विरोधकांनी आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण मी आता जनतेच्या कोर्टात जाणार आहे. दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घरात आणि रस्त्यावर जाऊन जनतेची भेट घेणार असून जनतेचा निकाल येईपर्यंत मुख्यमंत्रि‍पदावर राहाणार नाही.
केजरीवाल जनतेला आवाहन करत पुढे म्हणाले की, मी प्रामाणिक आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. दिल्लीच्या नागरिकांनी मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया आम्ही जबाबदारी स्वीकारणार आहोत. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या महाराष्ट्राच्या निवडणुकांसोबत निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत पक्षातीलच दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल. येत्या दोन-तीन दिवसांत आप आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढचा मुख्यमंत्री निश्चित करण्यात येईल.
भाजपावर टीका करताना केजरीवाल म्हणाले, भाजपला पक्ष तोडून सरकार स्थापन करायचे आहे. आमचे मनोबल त्यांना नष्ट करायचे होते, पण ते अपयशी ठरले. पक्ष तोडणे, आमदार तोडणे, नेत्यांना तुरुंगात पाठविणे हा फॉर्म्युला भाजपाने तयार केला आहे. केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून दिल्लीत सरकार स्थापन करू, असे त्यांना वाटत होते. पण ते आमचा पक्ष तोडू शकले नाहीत.

Web Title:
संबंधित बातम्या