दलित अत्याचार प्रकरणी कोर्टाने ९८ जणांना सुनावली जन्मठेप शिक्षा

बंगळुरू – कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित समाजाच्या झोपड्यांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने १०१ जणांना शिक्षा सुनावली आहे.१०१ दोषींपैकी ९८ दोषींना जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य तीन दोषींना ५ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायमूर्ती चंद्रशेखर सी यांनी या प्रकरणी १०१ जणांना दोषी ठरवले. सरकारी वकील अपर्णा बुंदी यांनी सांगितले की या प्रकरणात ११७ आरोपी होते. त्यापैकी १६ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. सध्या जन्मठेपेची शिक्षा झालेले सर्व दोषी बल्लारी मध्यवर्ती कारागृहात आहेत. देशात जातीय हिंसाचाराच्या प्रकरणात पहिल्यांदाच इतक्या लोकांना एकत्रितपणे शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ही घटना २८ ऑगस्ट २०१४ रोजी घडली होती.गावातील हॉटेल आणि न्हाव्याच्या दुकानात दलितांना प्रवेश नाकारल्याने पीडित आणि आरोपींमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आरोपींनी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात दलित समाजातील लोकांची घरे पेटवून दिली. या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. या हिंसाचारामुळे मराकुंबीत तीन महिन्यांपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्य दलित हक्क समितीने मराकुंबी ते बेंगळुरू असा मोर्चाही काढला होता. गंगावती पोलीस ठाण्याला अनेक दिवस घेराव घालण्यात आला होता.