Home / News / मतदानाची वेळ संपल्यावर मते 7.83 टक्के वाढली कशी? मतदान केंद्रांचे व्हिडिओ फुटेज दाखवा!

मतदानाची वेळ संपल्यावर मते 7.83 टक्के वाढली कशी? मतदान केंद्रांचे व्हिडिओ फुटेज दाखवा!

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या तफावतीबाबत कोणताही पुरावा मिळत नसल्याने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या तफावतीबाबत कोणताही पुरावा मिळत नसल्याने काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी यात्रा काढून या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमवर पुन्हा टीका केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले, त्याच रात्री 11.30 वाजता ते 65.02 टक्के तर दुसर्‍या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण 7.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल 76 लाख मतांची ही वाढ असून, मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न आहे. याचे उत्तर मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडिओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची आज मुंबईत टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व कार्यकारी सदस्य नसीम खान, माजी मंत्री के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी 5 वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघांवर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रीकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही? वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.
काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या